वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका
| कोलाड | वार्ताहर |
सात महिन्यांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड नाक्यावरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता प्रचंड उखडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, कोणाचा तरी जीव गेल्यावर या उखडलेल्या रस्त्याचे काम केले जाईल काय? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
पावसाळा सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक असूनही या उखडलेल्या रस्त्याचे काम केले अद्याप पूर्ण केले नाही. हा रस्ता एवढा प्रचंड उखडला आहे, की थोडा जरी पाऊस पडला, तरी या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होईल व येथून मार्ग काढतांना प्रवासी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागेल. यामुळे मोठा अपघात होणाची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असणार्या कोलाड नाक्याच्या आजूबाजूला 60 ते 65 गावे वाड्या, वस्त्या असल्यामुळे बाजारासाठी असंख्य नागरिक ये-जा करीत असतात, तसेच या परिसरात शाळा, कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज असल्यामुळे असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात, यामुळे येथे नागरिकांची सतत वर्दळ दिसून येते. तर, धाटाव एमआयडीसी, रोहा, अलिबाग, मुरुडकडे जाणारी-येणारी वाहने याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे वाहन चालकांसह, प्रवासी, तसेच पादचारी नागरिकांना येथून ये-जा करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, याकडे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन या उखडलेल्या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.







