जिल्हा रुग्णालय प्रशासन दुरूस्तीबाबत उदासीन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील जिल्हा रुग्णालय कायमच समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून शवविच्छेदन केंद्रापर्यंत जाणारा मार्ग खडतर झाला आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यास रुग्ण प्रशासन उदासीन ठरत आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याचे महत्त्वाचे रुग्णालय ओळखले जाते. पनवेलपासून पोलादपूरच्या टोकापर्यंतचे अनेक रुग्ण अलिबागला उपचारासाठी येतात. दोनशे खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी कायमच गर्दी असते. बाह्य रुग्ण कक्षाबरोबरच उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. मात्र, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शवविच्छेदनाकडे जाणारा रस्ता खडतर झाला आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राकडे मृतदेह नेताना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, रुग्ण प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याचा अद्याप प्रयत्न केला नसल्याचे बोलले जात आहे.