आदिवासी वाड्यांचा रस्ता वनविभागाच्या कात्रीत

माणगाव ग्रामपंचायतीतील प्रस्ताव प्रलंबित; आदिवासींमध्ये तीव्र नाराजी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर परिसरात आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता वनजमिनीतून जात असल्याने त्यासाठी आवश्यक असलेली वन विभागाची परवानगी मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यासाठीचा प्रस्ताव सादर होऊन तब्बल एक वर्ष उलटून गेले असले तरी चारपैकी एका ग्रामपंचायतीतील रस्त्याच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता अखंडपणे पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून, आदिवासी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

माथेरानचे डोंगर परिसरात 13 आदिवासी वाड्या असून, नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टी धनगरवाडी ते किरवली वाडी या सुमारे 13 किलोमीटर अंतरात या आदिवासीवाड्या वसलेल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून आदिवासी आणि धनगर समाज वास्तव्यास आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या वाड्या वन कायदा लागू झाल्यानंतर वन विभागाच्या अखत्यारित आल्या. त्यामुळे आजतागायत या भागात पक्के रस्ते होऊ शकले नाहीत.
शासनाने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत रस्त्यासाठी निधी मंजूर केल्यानंतर वन जमिनीच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. किरवली, उमराली व आसल या ग्रामपंचायतींतील वन जमिनीचे प्रस्ताव जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयाने मंजूर केल्याने त्या भागातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या आषाणेवाडी व सावरगाववाडी दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गात किरवली वाडी, आषाणेवाडी, सावरगाववाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, चिंचवाडी, सागाचीवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, बेकरेवाडी, जुम्मापट्टी धनगरवाडी या वाड्या आहेत. सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडीमध्ये रस्त्यांची कामे सुरु आहे.

मात्र, ग्रुप ग्रामपंचायत माणगाव वरेडी, बेकरेवाडी, असलवाडी, नाण्याचा माळ, मन्य धनगरवाडी व बेकरे धनगरवाडी या भागातील वन जमिनीच्या प्रस्तावाला अलिबाग येथील वन विभाग कार्यालयाने मंजुरी नाकारली आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी रस्ता अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभागाच्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी नागरिकांनी यापूर्वी श्रमदानातून पायवाटा तयार केल्या होत्या. आता पुन्हा एकदा आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी व गणेश पारधी यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतः आर्थिक भार उचलून नवीन वन प्रस्ताव तयार केला असून, तो अलिबाग येथील वन विभाग कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.

रस्त्याच्या दरम्यान असलेल्या ग्रामपंचायती ..
किरवली, माणगाव तर्फे वरेडी, उमरोली, आसल
आदिवासी वाड्या
किरवली वाडी, आषाणेवाडी, सावरगाववाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, चिंचवाडी, सागाचीवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, बेकरेवाडी, जुम्मापट्टी धनगरवाडी, या वाड्या आहेत. सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडी रस्त्याचे काम सुरू आहे.
रस्त्याचे एकूण अंतर ..
13.5 किलोमीटर
रस्त्यात चार ठिकाणी नाल्यावर पूल बांधावे लागणार
लहान साकव यांची निर्मिती
मंजूर वन जमिनीचे प्रस्ताव ..
किरवली ग्रामपंचायत,उमरोली ग्रामपंचायत (वावरले ग्रामपंचायत ),आसल ग्रामपंचायत
मंजुरी न मिळालेले वन जमिनीचे प्रस्ताव
सागाची वाडी पासून धनगर वाडा जुम्मापट्टी

आमच्या हक्काचा रस्ता देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्साहन्नी बनतो आहे, मात्र वन जमिनीतून रस्ता बनविण्याचा 3/2 प्रस्ताव मंजूर न केल्यास या भागातील रस्ता होणार नसलेल्या पाच आदिवासी वाडीतील आदिवासी समाज स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहेत.

-गणेश पारधी,
आदिवासी कार्यकर्ते

Exit mobile version