वर्षभरातच रस्ता उखडला

| उरण | वार्ताहर |

दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणारा मोठी जुई ते मोठे भोम हा रस्ता एक वर्षाच्या आत उघडल्याने प्रवाशांना उखडलेल्या, खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करावा लागत आहे. तरी, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहेत. परंतु, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावागावात करण्यात येत असणारी अनेक विकासकामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणाऱ्या मोठी जुई ते मोठे भोम या रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी मागील वर्षी खर्च करण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागामुळे सदरचा रस्ता हा एक वर्षाच्या आत उखडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा त्रास हा वाहन चालक, प्रवासी, नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी बांधकाम विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version