पाली बाह्यवळणाचा वनवास संपेना

। पाली । वार्ताहर ।

पाली बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून तब्बल 14 वर्षे उलटली आहेत. या रस्त्याच्या कामासाठी 18 कोटी; तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी पालीत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जटील बनला आहे. वाहनचालक व प्रवासी यांचीदेखील प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे.

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (ए) व पाली-पाटणूस राज्यमार्ग 94 ला जोडला जाणारा हा बाह्यवळण मार्ग म्हणजे पाली शहरातील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय आहे. असे असताना या बाह्यवळण मार्ग करण्यास राज्य सरकारला मुहूर्त कधी सापडणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जटील होत आहे. भाविकांना, पर्यटकांना, नागरिकांना भेडसावणार्‍या या गंभीर समस्येकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याशिवाय संपादित होणार्‍या जमिनीला चांगला मोबदला मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी जमीन देण्यास तयार नसून शेतकरी संघटनेने आंदोलनदेखील केले होते.

बल्लाळेश्‍वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एस. टी. स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्‍वर चौक अशा बहुतांश ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्‍वर मंदिर परिसरात देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात असतात. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण मार्ग लवकर करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

इतर वाहनांची रेलचेल
मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरून किंवा वाकणवरून पुढे जातात. कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरून विळेमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते; मात्र बाह्यवळण मार्ग झाल्यास ही सर्व वाहने पालीच्या बाहेरून जाऊ शकतील आणि पालीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न संपुष्टात येईल.
भाविक, पर्यटकांची गैरसोय
पालीत नेहमीच भाविकांची गर्दी असते. त्यातच नाताळ, माघी गणेशोत्सव, गणपती व उन्हाळी सुट्ट्यामध्ये दररोज हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत असतात. त्याबरोबरच पाली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. त्यातच पालीत अवजड वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होते. तसेच वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघातदेखील झाले आहेत.

पाली बाह्यवळणाच्या भूसंपादनासाठी नऊ हेक्टर जागेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाली-बलाप-बुरूमाळी व झाप येथील जागांच्या किमती अंतिम करण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहे. किमती अंतिम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

संजय वायचले,
उपअभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली
Exit mobile version