रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे पालिकाचे दुर्लक्ष
| पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहतीमधील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड़े पडलेले असून काही भागांत डांबरही निघालेले आहे. रस्ते दुरुस्तीबाबत विचारणा केली असता, सिडको आणि पालिका एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे या रस्त्यांचे वाली कोण? असा प्रश्न खारघरवासीयांना पडला आहे.
सिडकोने खारघर शहराची निर्मिती करून 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्या वेळी सिडकोने तयार केलेल्या रस्त्याची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. सिडकोकडून अनेक वेळा मलमपट्टी करण्यात आली. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. पाच वर्षांपूर्वी पनवेल पालिका अस्तित्वात आल्यानंतर खारघरचा पालिकेत समावेश करण्यात आला. त्यानंतर मात्र सिडकोने खारघरच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. हळूहळू सर्व सुविधा पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येत आहेत. सिडकोकडून किरकोळ कामे केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, खारघरच्या समस्येत भर पडत आहे.
पावसाळ्यात येथील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडलेले होते. खड्डयात पडून किरकोळ अपघाताच्या घटनेत वाढ झाल्यामुळे सिडको आणि पालिका या दोन्ही प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी करत खड्डे दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पावसाळा संपताच रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल, असे सिडको अथवा पालिकेकडून सांगण्यात आले. सध्या खारघरमधील रस्त्यांची दुरवस्थाझाली असून, रस्त्यावर उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पालिका आणि सिडको रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे खारघरमधील रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न खारघरवासीयांकडून विचारला जात आहे. याविषयी सिडकोच्या खारघर कार्यालयातील अधिकार्याकडे विचारणा केली असता, खारघरच्या रस्त्याची जबाबदारी पनवेल महापालिकेची असल्याचे सांगितले.