| हमरापूर | वार्ताहर |
गणपती बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, पेण तालुक्यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांगसुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर आफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीही 20 टक्के वाढल्या आहेत. सध्या सर्वच कारखान्यांतील काम अंतिम टप्प्यात असून, कारागीर रात्रं-दिवस काम करीत आहेत. विशेष म्हणजे, महिलांचाही यात मोठा सहभाग आहे.
कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी सर्वच व्यवसायावर परिणाम झाला. त्यातून गणेशमूर्ती व्यवसायदेखील सुटला नाही. मात्र, यावर्षी कोरोनोचे सावट दूर झाल्याने चांगला प्रतिसाद मिळाला. पेणच्या मूर्तिकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती परराज्यासह सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. मूर्ती तयार करण्यातील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती, कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नवे देण्याचा प्रयत्न, कुशलता या सार्या बाबी कारणीभूत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्री झाल्या नाहीत. मात्र, यावर्षी कोरोनो गेल्याने गणेश मुर्तिकारांनी जिद्दीने हे काम सुरु केले. आता गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने मूर्तिकार व कामगारांची मोठीच धावपळ सुरू आहे. सध्या मूर्ती फिनिशिंग, रंगकाम, आखणी, सजावट तसेच फेटे बांधणे अशा चारही आघाड्यांवर दिवस-रात्र काम सुरू आहे.
बाप्पांची विदेशवारी
पेण शहर व तालुक्यातून परराज्यासह परदेशातदेखील साधारणतः तीन महिन्यांपूर्वीच विविध आकारातील गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह परदेशात जवळपास 40 हजार गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
करोेडोंची उलाढाल
पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. जोहे, हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, उंबर्डे व इतर गावातदेखील पूर्वांपार सुरु आहेत. या कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. यातून 30 ते 35 हजार लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे 70 ते 80 कोटींची वार्षिक उलाढाल होते.
दोनशे प्रकारच्या मूर्ती
गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. चित्रपट, मालिका यांचा विशेष प्रभाव मूर्ती निर्मितीत दिसतो. यावर्षीही पेणमध्ये 200 हून अधिक विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. त्यात कृष्ण बासुरी, चिंतामणी, लालबाग, पेशवा, बालमुर्ती, हत्तीकोच, टिटवाळा, विठ्ठल, नाखवा या व इतर आकारातील या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांतही रवाना झाल्या आहेत.
यावर्षी कोरोनोचा प्रसार कमी झाला असल्याने तसेच राज्य शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी दिली असल्याने बर्यापैकी व्यवसाय झाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींनाच जास्त मागणी आहे. त्यामुळे शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी कायमस्वरुपी उठवावी.
अभय म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटना