पहाटेची घटना! जाळी उचलत असताना तोल गेला, अन्….

। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।
समुद्रात मासेमारी करीत असताना एकदरा गावच्या पद्मावती नौकेवरील खलाशी लक्ष्मण कमळ्या निशानदार (वय 52) हे समुद्रात पडून बेपत्ता झाले. ही घटना मंगळवारी (दि.25) पहाटे साडेचारच्या सुमारास घडल्याची माहीती एकदरा कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते मोतीराम पाटील आणि एकदरा हनुमान मच्छीमार सह. सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी एकदरा येथे बोलताना दिली. सकाळपासून 5 नौका आणि तटरक्षक दलाच्या नौकेमार्फत शोधकार्य सुरु असून दुपारी 2 वाजे पर्यंत लक्ष्मण याचा शोध लागला नाही.

हरिचंद्र निशानदार यांची पद्मावती नौका 11 मच्छीमारांना घेऊन खोल समुद्रात गेली होती. रात्री कासा किल्याच्या पाठीमागील बाजूस शेवटची मासेमारी जाळी वर उचलत असताना लक्ष्मण निशानदार यांचा अचानक तोल जाऊन ते समुद्रात पडले.

सहकार्‍यांनी समुद्रात उड्या मारून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र धुके, प्रचंड काळोख आणि थंडी, वादळी वारे यामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दुपारपर्यंत तब्बल 10 तास शोध घेऊनही कोणताही मागमूस मिळाला नाही. या घटनेची तक्रार मुरूड पोलीस, मेरिटाईम बोर्ड आदि ठिकाणी नोंदविण्यात आली आहे. शोधकार्य सुरूच असून अजुन काही नौका त्यासाठी रवाना झाल्या आहेत.

Exit mobile version