| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेलमधील एका प्लायवूड विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला असलेल्या तरुणाने प्लायवूड विक्रीतून आलेल्या पावणे तीन लाखांची रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल आहे.
पनवेलच्या नेरे गावात राहणारा रूपेश यादव हा नवीन पनवेल सेक्टर-1 मधील मयंक प्लाय अँड डोअर या प्लायवूड विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता. मयंक प्लाय या दुकानातून पनवेलमधील इतर दुकानदारांना प्लायवूड तसेच फ्लश डोअर विक्री केले जात असल्याने विक्री केलेल्या मालाची रक्कम वसूल करण्याचे काम तो करत होता. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता रूपेश यादव पनवेलमधील वेगवेगळ्या दुकानदारांकडे पैशांचे कलेक्शन करण्यासाठी गेला होता. जवळपास पावणे तीन लाखांची रक्कम त्याने वसूल केली होती. मात्र ही रक्कम दुकानात जमा करण्याऐवजी त्याने पलायन केले आहे. सायंकाळी उशिरा दुकान मालकाने रूपेशच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आल्याने अखेर याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.