मिठाचा हंगाम लांबणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वसई तालुक्यातील मिठाचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. साधारण सप्टेंबरअखेर मिठाच्या नव्या हंगामाला सुरुवात होते; परंतु पावसामुळे मिठाचा हंगाम लांबणीवर पडल्याने त्याचा फटका मीठ उत्पादकांना बसू लागला आहे. इतर व्यवसायाला ज्याप्रमाणे मदतीचा हात दिला जातो, त्याप्रमाणे मीठ उत्पादकांनाही केंद्र सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील मीठ उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे. मिरा-भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत. साधारण मार्च, एप्रिल आणि मेदरम्यान मिठाचे उत्पादन होते. पावसाळ्यात मिठाचे डोंगर करून त्यावर गवत टाकून ते झाकले जाते आणि पावसाळा संपला की गवत काढून नवा हंगाम सुरू होतो. मात्र पावसामुळे ही मिठागरे आता उशिराने खुली होणार आहेत.

Exit mobile version