तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी; शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यातील खारेपाट विभागात वाशी, वढाव, बोरी, शिरकी, वडखळ आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मीठाचे उत्पादन होते. मीठ हा प्रत्येकाच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मीठामुळे जेवणाची चव रुचकर होते. पण या मीठाचे उत्पादन करणारे कोकणातील शेतकरी अडचणीत आले आहेत. मीठ उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत, मात्र सरकार येथील समस्या ग्रस्त शेतकर्यांकडे वारंवार काणाडोळा करीत आहे.

मीठ कोकणात तयार होते. प्रत्येकाच्या आहाराचा स्वाद वाढवणार्या या मीठाचे उत्पादन करणार्या शेतकर्यांचे आयुष्य मात्र विविध समस्यांमुळे अडचणीत आले आहे. येथील नामदेव नारायण म्हात्रे या शेतकर्याने सांगितले की, मी पिढ्यानपिढ्या आई, वडील, बहीण, मुलगा मिठागर व्यवसायात आहे. ज्यावेळी महापूर आला त्यावेळी खजिन्यात साठवण समुद्राच पाणी होता, त्याची साठवण कमी झाली व बांध बंदिस्ती उध्वस्त झाली. कालवा आल्याने मिठाला आवश्यक असलेली डिग्री होत नाही, समुद्राच्या निव्वळ पाण्यात इतर पाणी मिसळल्याने मीठ बनण्यास अडसर निर्माण झाला. पूर्वी जिथं 500 गोणी मीठ उत्पादन होत होते, आता केवळ 100 गोणी जेमतेम मिळतात. उत्पादन कमी झाल्याने मजुरांची मजुरी परवडत नाही, माती कामाला येणारा खर्च परवडत नाही, सरकारने यावर उपाययोजना करावी, असे म्हात्रे यांनी सांगितले. हरीचंद्र शंकर पाटील हे शेतकरी म्हणाले की, आता आवश्यक तितका पाण्याचा पुरवठा मिठागराला होत नाही. त्यामुळे उत्पन्न खूपच कमी झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत निम्मे उत्पन्न देखील आता मिळत नाही.
भरतीच्या पाण्यामुळे मिठागर शेतीत गाळ येऊन मीठ उत्पन्नात घट झाली आहे. आजूबाजूच्या कंपन्या रसायन मिश्रित पाणी खाडी व नदीत सोडतात, त्यामुळे खार्या पाण्यात मिठाला आवश्यक डिग्री मिळत नाही, त्यामुळे मीठ उत्पादन घटले आहे. आमच्या तीन पिढ्या येथे मिठागर व्यवसायात आहेत, मात्र आज आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गणेश पाटील, मीठ उत्पादक
येथील परंपरागत मीठ उत्पादक शेतकरी नदी तसेच खाडीतील खारेपाणी वापरून मिठ उत्पादन करतात. पण आता या व्यवसायाला विविध संकटांनी घेरलेले आहे. या सर्व समस्यांमुळे मीठ उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहतूक समस्या, मजुरांची वाढलेली मजुरी यामुळे मिठाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. परंतु या परिसरातील काही कंपन्यांमुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे खार्या पाण्यातील मिठाची मात्रा कमी होउन मीठाचे उत्पन्न घटले आहे.
सर्वसामान्यांच्या आहारातील अत्यावश्यक भाग असलेल्या मीठ व्यवसायावर रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपला चरितार्थ चालवतात. परंतु हा व्यवसाय अडचणीत आल्याने हळूहळू हे शेतकरी या व्यवसायातून बाहेर पडत आहेत. महाराष्ट्र सरकारने या मिठागरांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी मीठ उत्पादक शेतकरी करत आहेत.