। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने सोमवारपासून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी रायगड जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी अशा एकूण तीन हजार 687 शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण पाच लाख 17 हजार 667 विद्यार्थी असून एकूण वीस हजार 169 शिक्षण आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सहा जानेवारीपासून रायगड जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या होत्या. मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे 28 जानेवारी रोजी जिल्हा स्तरीय टास्क फोर्सच्या आढाव्यानंतर पनवेल तालुका वगळता उर्वरित तालुक्यातील शाळा 31 जानेवारीपासून सुरु करण्यात येतील असे जिल्हाधिाकारी महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने मुल, शिक्षक पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा प्रशासनाकडूनही कोरोना नियमांचे पालन करून मुलांना ऑफलाईन शिक्षण सुरू केले आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेतील वर्ग सॅनिटायझर केले आहेत. शाळेत येणार्र्या विद्यार्थ्यांची तापमान तपासणी आणि सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे. शाळेत एका बेचवर एक विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. शाळेत एक दिवस आड विद्यार्थी येणार असून सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.