कातळशिल्पे पोहचली आंतरराष्ट्रीय पातळीवर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील आठ आणि गोव्यातील एक अशा एकूण नऊ ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश असून, अश्मयुगीन काळापासूनची ही कातळशिल्पे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. युनेस्कोकडून जगभरातील वारसास्थळांची यादी तयार केली जाते. गेल्या वर्षी गडकिल्ल्यांचा या यादीत समावेश झाला होता. गेल्या काही वर्षांत कोकणातील सडयांवर कातळशिल्पांचा शोध लागला आहे. त्यामुळे वारसा स्थळांच्या यादीत समावेश होऊन कोकणातील कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत या कातळशिल्पांना स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रुंध्ये तळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोल, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल या ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश आहे. साधारणपणे वीस हजार वर्षे जुनी आणि तिसर्‍या शतकापर्यंत सुरू असलेली ही कातळशिल्पे आहेत. त्यामुळे अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना म्हणून या कातळशिल्पांकडे पाहता येते.

Exit mobile version