मनसेच्या त्या 44 कार्यकर्त्यांचा शोध सुरु

| मुंबई | प्रतिनिधी |

उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळफेक आणि शेणाचा मारा करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या गाडीवर नारळ आणि शेणाचा मारा केल्यानंतर मनसेचे सुमारे 44 कार्यकर्ते पसार झाले होते. यापैकी कोणीही अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. मात्र, या कार्यकर्त्यांवर पोलीसांकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनबाहेर राडा घालणार्‍या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केले होते. रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या मनसेच्या कार्यकर्त्यांचा शोध पुन्हा सुरु केल्याची माहिती आहे.

सिंधुदुर्ग मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण किंवा नारळ फेकणे हा दोन भावांमधील वाद आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्याविषयी काही बोललं की लोकांचा उद्रेक वाढतो. त्यामुळे संजय राऊत यांनी त्या पद्धतीने बोलणं बंद केलं पाहिजे. हे ठाकरे कुटुंबाला शोभणारे नाही. राज ठाकरे लोकनेते असल्याने त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक येतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेला काहीच लोक जमतात. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे माडलेले प्रश्‍न लगेच कसे सुटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपार्‍या फेकण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. ठाकरे गटाच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारले होते. यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरही शेण फेकण्यात आले होते. याबाबत दीपक केसरकर यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अ‍ॅक्शनला रिएक्शन देण्यासाठी मुसलमान लोक तुम्हाला शोधत आहेत, त्यांना आधी उत्तर दया. त्यांनी तुम्हाला मोठं मताधिक्य दिलं, त्यामुळे आता तुम्हाला ते शोधताहेत, आता ते तुम्हाला सोडणार नाहीत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Exit mobile version