‘माझी शाळा, सुंदर शाळां’चा दुसरा टप्पा जाहीर

। रायगड । प्रतिनिधी ।

शैक्षणिक गुणवत्तेसोबत आरोग्य स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून व्यक्तिमत्त्व विकासासाठी चालना देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. 5 ऑगस्ट रोजी औपचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात होईल.

या अभियानानंतर 5 ते 15 सप्टेंबर या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडेल. राज्यस्तरावर शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीवर या अभियानाची जबाबदारी असेल. यासाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत पूर्वतयारी केली जाईल. शालेय शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभागाचे क्षेत्रीय कार्यालय, शाळा यांना या अभियानात सहभागी होण्यासोबतच त्यांच्या नोंदणीसंदर्भातली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या अभियानासाठी शाळांना पायाभूत सुविधेसाठी 33 गुण, शासन ध्येय धोरणांसाठी 74 आणि शैक्षणिक संपादणूक यासाठी 43 गुण दिले जाणार आहेत. या अभियानामध्ये सहभागी होणार्‍या शाळांची एकूणच शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षातील झालेली पटसंख्या वाढ आणि गळती झाल्यास ती सुधारण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आदींच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. यामुळे अनेक शाळांचा यामध्ये कस लागणार आहे. राज्यात हे अभियान यशस्वी व्हावे, यासाठी या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 12.90 कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे.

जबाबदारी निश्‍चित
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांच्या मूल्यांकनाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीची असेल, तर उर्वरित महाराष्ट्रात प्राथमिक स्तरावरील मूल्यांकनाची समिती केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली असेल. तालुकास्तरावरील मूल्यांकन समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर मूल्यांकनाचे कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असेल आणि राज्यस्तरावरील मूल्यांकनाचे कार्य हे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे असेल. ही समिती प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांकाच्या शाळेच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यापैकी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे पहिल्या व दुसर्‍या तिसर्‍या क्रमांकासाठी निवड करेल.
Exit mobile version