भूकेलेल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अंकुर

| माणगाव | प्रतिनिधी |

मानवतेसाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे भुकेल्या माणसाला अन्नदान करणे होय. या भावनेतूनच लोणेरे येथील अंकुर फाउंडेशन गेली अकरा वर्षे दुर्गम भागातील गरीब, आदिवासी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमवेत जागतिक अन्नदान दिन साजरा करत आहे. या उपक्रमाद्वारे या दिनी आजवर अनेक लहान मुलांना, कुटुंबांना आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले आहे.

यावर्षी माणगाव तालुक्यातील राजिप शाळा कुमशेत आणि शिरवली आदिवासी वाडी 16 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम संपन्न झाला. या ठिकाणी अनेक गरीब व वंचित विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या लहानग्यांना आणि त्यांच्या पालकांना एकत्र येऊन प्रेम, आपुलकी व सहानुभूतीपूर्वक अन्नदान करण्यात आले. खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी संस्थेच्या उपस्थित सर्व सदस्य व पदाधिकारी स्वत: रुचकर जेवण बनवून या विद्यार्थ्यांना जेऊ घालतात. यावेळेस सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सामाजिक बांधिलकी जपत या अन्नदानासाठी सहकार्य करणाऱ्या दानशुरांचे आभार व्यक्त करण्यात आले. या अन्नदान दिनी आपण सर्व मिळून भूक मिटवू, माणुसकी वाढवू आणि समाजात आपलेलणाचा संदेश पोहोचवू, या असा संदेश देण्यात आला.

Exit mobile version