| तळा | प्रतिनिधी |
तळा नगरपंचायतीचे बाजारपेठेतील अकरा गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांना लागूनच असलेल्या गटाराचे सांडपाणी पूर्णपणे गाळेधारकांसमोर साचून पुढे रस्त्यावर वाहत जाते. नगरपंचायतीने फेब्रुवारी महिन्यात या गटाराचे काम केले होते. परंतु, हे काम कुचकामी ठरले असून सांडपाण्याची समस्या जैसे थे असल्याने व्यापाऱ्यांना सांडपाण्यात बसूनच व्यवसाय करावा लागत आहे. नगरपंचायतीने रस्त्यावर वाढीव बांधकाम केले तरी सांडपाण्याचा निचरा थांबत नाही.
त्यामुळे नगरपंचायतीचे लाखो रुपये वाया गेले असून सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या कधी सुटणार? असा प्रश्न आता व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.
तळा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका तळा शहरातील नागरिक व व्यावसायिकांना बसत आहे. लाखो रुपये खर्चुन बाजारपेठेतील मच्छी मार्केट ते रिक्षा स्टँडपर्यंत गटाराचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील सांडपाण्याचा निचरा थांबत नसल्याने सांडपाणी पुन्हा रस्त्यावर तुंबत आहे. या गटारातील सांडपाण्याच्या निचऱ्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून पाण्याच्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांसह नागरीक बेजार झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने बांधलेली गटारं कूचकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गटार नेमके कशासाठी बांधले? असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.






