उरणमध्ये शेवळांचे पीक बहरले

| उरण | प्रतिनिधी |

जून महिना सुरू झाला असून, आकाशात ढगांची तुरळक उपस्थिती आहे. मात्र, पावसाचा थेंबही अद्याप पडलेला नाही. वातावरणात प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतानाही उरण परिसरात पावसाळ्याची चाहूल देणाऱ्या शेवळाच्या भाजीने बाजारपेठ गाठल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे मुसळधार पावसाच्या काही दिवसांनंतर डोंगर, शेतमळे आणि ओलसर भागांत उगवणारी शेवळाची भाजी यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहे.

उरण शहरासह ग्रामीण भागातील विविध बाजारपेठा, चौक आणि नाक्यांवर सध्या शेवळाची भाजी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. डोक्यावर टोपल्या घेऊन किंवा रस्त्याच्या कडेला बसून अनेक महिला व विक्रेते शेवळांची विक्री करताना दिसत आहेत. पावसाळी भाज्यांची आवड असलेल्या नागरिकांकडूनही या भाजीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सामान्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्यांचा हंगाम सुरू होतो. शेवळे, तांदळा, भारंगी, कुर्डू यांसारख्या पारंपरिक रानभाज्या बाजारात येतात. मात्र यंदा पावसाळ्याच्या आधीच शेवळांची आवक झाल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वाढलेली आर्द्रता, अधूनमधून झालेल्या पूर्वमोसमी सरी आणि हवामानातील बदल यामुळे शेवळांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version