श्रीवर्धन किनाऱ्यावर शुकशुकाट

सुट्ट्यांचा हंगाम संपला; हॉटेल व्यवसायिकांवर मंदीचे सावट

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

मागील वर्षी 14 मे लाच पावसाळा सुरू झाल्यामुळे पर्यटन व्यवसायिकांचा जवळजवळ एक महिना फुकट गेला होता. तर यावर्षी पावसाळा देखील एक महिना लांबल्याने पर्यटकांचा पर्यटन व्यवसाय एक महिना उशीरा सुरू झाला. दिवाळीची सुट्टी नंतर नाताळची सुट्टी या काळामध्ये शाळांना सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक श्रीवर्धन परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर येत होते. श्रीवर्धन शहरातील व तालुक्यातील बहुतेक हॉटेल व रिसॉर्ट्स हाउसफुल्ल असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. परंतु, आत्ता सुट्ट्यांचा हंगाम संपला आहे. पुढच्याच महिन्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होतील. त्यामुळे आता पर्यटकांचा ओघ फक्त शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी असणार आहे.

शनिवार आणि रविवार दोन दिवस संपूर्ण श्रीवर्धन समुद्रकिनारा पर्यटकांनी फुललेला होता. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर असलेले बोटिंग व्यावसायिक, त्याचप्रमाणे इतर व्यवसाय करणारे यांच्याकडे तुफान गर्दी होती. परंतु, आज सोमवारी सकाळी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला असता, समुद्रकिनारी पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. आता पर्यटकांची संख्या वाढेल ती 24, 25 व 26 जानेवारी रोजी कारण सोमवारी 26 तारखेला सुट्टी असल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन शहरातील हॉटेल्स पर्यटकांनी भरून जाणार आहेत. मात्र, मधले दिवस हे पर्यटन व्यवसायिकांसाठी मंदीचे दिवस असणार आहेत.
श्रीवर्धन शहरांमध्ये शाळांच्या व महाविद्यालयांच्या सहली देखील मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, त्याचा फायदा या ठिकाणाच्या हॉटेल व्यवसायिकांना होत नाही. कारण सहलींचे आयोजक जेवण बनवण्याचे सर्व साहित्य व आचारी सोबत आणत असल्यामुळे समुद्रकिनारी किंवा मठाचा गवंड परिसरात सदर सहलींचे आयोजक उघड्यावर अन्न शिजवतात व त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण वाढतात. त्यामुळे हा परिसर देखील अस्वच्छ होतो. यावरती श्रीवर्धन नगरपरिषदेने कारवाई करणे आवश्यक आहे. कोणतेही पर्यटक श्रीवर्धन शहरात उघड्यावर अन्न शिजवताना आढळून आले. तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली तरच या प्रकाराला आळा बसणार आहे.

जेणेकरून शहरातील हॉटेल व्यवसायिकांना येणाऱ्या सहलीं पासून आर्थिक उत्पन्न मिळेल. श्रीवर्धन समुद्रकिनारी पोलिसांनी पार्किंगची तात्पुरती व्यवस्था करून घेतली असली तरी, भविष्यात श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून पे अँड पार्क न केल्यास श्रीवर्धन समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची समस्या भेडसावणार आहे. तरी श्रीवर्धनच्या आमदार व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Exit mobile version