| रेवदंडा | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसात अलिबाग-चौल रस्त्यावरील मुखरी गणपती नजीकचा साईडपट्टा हरवला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनांसाठी अपघाताला निमत्रंण ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दयनिय अवस्था झालेली आहे. चालकांसह प्रवासी वर्गाला देखील आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच अलिबाग-चौल रस्त्यावरील मुखरी गणपती नजीकच्या रस्त्यावरील साईडपट्टीच हरवली आहे. त्या रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटाराच्या बाजूकडील माती वाहून गेल्याने रस्त्याचा साईडपट्टा वाहून गेला आहे. साईडपट्टा निघून गेल्याने हा रस्ता अरूंद झाला आहे. तसेच, त्या ठिकाणी खोलगट भाग असल्याने मोठी दोन अवजड वाहने पास करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. संबधीत खात्याने तात्काळ या रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम करावे व तेथील गटार सुद्धा नव्याने बांधावेत. तसेच, हा रस्ता धोकादायक असल्याने येथून ये-जा करत असलेल्या वाहनांच्या सावधानतेसाठी फलक लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासीवर्ग, वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
चौल रस्ताचा साईडपट्टा हरवला
