। अलिबाग । प्रमोद जाधव ।
उमटे धरणातील गाळ सामाजिक बांधिलकीतून काढल्यानंतर धरणाच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग खडबडून जागे झाले. या धरणातील दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी ठेका देण्याकरिता गेल्या अनेक महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया अजूनही पूर्ण न झाल्याने धरणातील गाळ निविदाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर येत आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अलिबाग तालुक्यातील उमटे धरण गेल्या 47 वर्षांपूर्वी बांधले आहे. 1978 ला या धरणाची निर्मिती झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेला 1995 मध्ये हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ताब्यात हे धरण आहे. या धरणाची उंची 54.60 मीटर इतकी आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर इतकी आहे. या धरणामार्फत 12 ग्रामपंचायतींमधील 46 गावे, 33 वाड्यांमधील 65 हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
उमटे धरण गाळात रुतल्याने शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत सीएफटीआयच्या मदतीने धरणातील गाळ मागील वर्षी मे महिन्यात काढला. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीदेखील गाळ काढण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. उमटे धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी निविदा काढण्याची हालचाल सुरु झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलजीवन अंतर्गत उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अस्तित्वातील उमटे धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी सुमारे 8 कोटी 81 लाख 35 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून ही निविदा प्रक्रिया सुरु आहे. या कामासाठी दोन कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यांची तांत्रिक तपासणी करून पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एप्रिल महिना सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी दोनच महिने शिल्लक राहिले आहेत. निविदांच्या विळख्यात सापडलेल्या या धरणाचे काम आता पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमटे धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. सुरुवातीला दोन वेळा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आता दोन कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. तांत्रिक पडताळणी केल्यानंतर निविदा उघडून पात्र असलेल्या कंपनीला कामाचा ठेका दिला जाईल. या प्रक्रियेला महिना लागेल. त्यामुळे मे महिन्यात गाळ काढण्याची शक्यता आहे.
मुनाब शेख, उपअभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अलिबाग