वडघरमध्ये घुमला आरे बचावचा नारा

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात वर्षारंग पावसाळी संमेलन!
। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात मवर्षारंगफ हे पावसाळी संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात राज्यभरातील तरूणाईने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी आरे बचावचा नारा देण्यात आला.

कोकणातील भात लावणीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरूजी राष्ट्रीयस्मारकात दरवर्षी जुलै महिन्यात हे संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार तसेच स्मारकाच्या आंतरभारती कला भवनाचे अध्यक्ष युवराज मोहिते यांनी सर्व सहभागीना सामील करुन घेत अत्यंत कल्पकतेने केले होते.या संमेलनातून सहभागीनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चात आरे बचाव च्या नार्‍याने स्मारकाचा परिसर दुमदुमला.

यावेळी सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.दुपारी स्मारकाच्या शेतातील भात लावणीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला. संध्याकाळच्या सांस्कृतिक सभेत सर्वांना खळखळून हसविणार्‍या पु. ल. देशपांडे यांची चिंतनशील बाजू मांडणारा प्रयोगशाळा प्रस्तुत पुरुषोत्तम हा अभिवाचन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सादरीकरण तक्षील खानविलकर, सुमेध समर्थ आणि मल्हार शितोळे या नामवंत कलाकारांनी केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी नेचर ट्रेल काढण्यात आली. वनस्पती परिचय, पक्षी निरक्षण याचे मार्गदर्शन मल्हार इंदुलकर यांनी सर्वांना केले.चिखलातील खेळ, रानभाज्या, गप्पा पावसातील गाणी, असा एकूण माहोल रंगला होता. राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेतकरी, कष्टकर्‍यांच्या श्रमाचे मोल समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, तरूण-तरूणी, बालके, महिला यांनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली होती. संमेलनाचा समारोप स्मारकाचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केला.

यावेळी सचिव राजन इंदुलकर, कोषाध्यक्ष माधुरी पाटील, माजी विश्‍वस्त वसंत एकबोटे, जयश्री सामंत, राष्ट्र सेवा दलाचे जैश्ठ कार्यकर्ते अलका एकबोटे, सुहास कोते, शशिकांत पाटील तसेच प्रा. अभिजित देशपांडे इ. उपस्थित होते. स्मारकाचे व्यवस्थापक राकेश यांच्या मार्गदर्शनाखाली युवा छावणीतील कार्यकर्त्यांनी या संमेलनाचे व्यवस्थापन सांभाळले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समाजाला जोडणार्‍या अश्या अनेक उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करत असते, यावेळीही लॉकडाऊननंतर आयोजित या कार्यक्रमाने हा परिसर फुलून गेला होता. अत्यंत उत्साहात हे संमेलन संपन्न झाले.

Exit mobile version