| रोहा | प्रतिनिधी |
उराशी जिद्द बाळगले आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली, तर स्नप्नांना सहज गवसणी घालता येते, हे सिध्द करुन दाखवले आहे रोहा तालुक्यातील एका रिक्षा चालकाच्या मुलानेे. शहरातील रिक्षा चालक अ.समद कर्जिकर यांचा मुलगा सर्जील हा डॉक्टर झाला आहे. त्याच्या यशाने त्याच्या वडिलांना आकाश पार ठेंगणे झाले आहे. डॉ. सर्जीलने मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
के.ई.एस.मेहेंदळे हायस्कुलमध्ये प्राथमिक शिक्षण त्याने घेतेल आहे. पुढे ज्युनियर कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सर्जीलने पुढील सिनियर कॉलेज ते डिग्रीपर्यंत कोएसो लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज वेंगुर्ला-सिंधुदुर्ग या ठिकाणी पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षी त्याची जनरल सेक्रेटरी पदावरदेखील निवड करण्यात आली होती. घरची परिस्थिती हलाखीची असताना कष्ट व प्रचंड मेहनत तसेच जिद्दीच्या जोरावर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आपल्या सहकारी रिक्षा चालकाचा मुलगा डॉक्टर झाल्याने पीर गाझी शेख सलाऊद्दीन दर्गा रिक्षा चालक मालक कमिटीच्या वतीने डॉ.सर्जील याचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्जीलप्रमाणेच समाजातील मुलांनी प्रेरणा घ्यावी आणि शिक्षणातून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी समाज अध्यक्ष एजाज किरकिरे, उपाध्यक्ष सुलतान पानसरे, अनिस मोरबेकर, अफसर कर्जिकर, उस्मान रोहेकर, महमद डबीर,अहमद दर्जी, निसार मोरबेकर, इरफान दर्जी, मजीद पठाण, सेवक बिलाल मोरबेकर,उपशहर प्रमुख समीर दाखवे,शिवसेना अल्पसंख्याक विभाग प्रमुख मुजम्मील येरुणकर, इस्माईल रोहेकर,मुबीन रोहेकर आदी समाज बांधवांनी तसेच रिक्षा चालक व मालक संघटनेचे सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, माझ्या वडिलांनी मला खूप मेहनत घेऊन शिक्षण दिले आहे. मी डॉक्टर व्हावे असे माझ्यासह माझ्या कुटुंबाचेदेखील स्वप्न होते. माझ्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी करणार असल्याचे डॉ. सर्जील यांने सांगितले.
माझ्या मुलाने फार जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आहे. आज तो डॉक्टर झाल्याने आमचे स्वप्न साकार झाले आहे, असे डॉ. सर्जीलचे वडील अ.समद कर्जिकर यांनी सांगितले.







