तमाश्याच्या गैरहजेरीने रसिक प्रेक्षकांमध्ये नाराजी; असुरक्षित भावनेमुळे फिरवताहेत पाठ?
| रेवदंडा | प्रतिनिधी |
गावागावातील प्रसिद्ध जत्रा-यात्रा या महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात देखील आजही प्रसिद्धीस आहेत. या जत्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवा खऱ्या अर्थाने तमाशा व लावणीने जपून ठेवला आहे. असंख्य रसिक प्रेक्षक या जत्रेच्या माध्यमातून या लोककलेचा आनंद लुटत असतात. असाच लावणीचा फड एकेकाळी अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथे भरणाऱ्या दत्ताच्या यात्रेत असायचा. या यात्रेनिमित्त चौल पंचक्रोशीसह जिल्ह्यातील रसिक प्रेक्षक लावणीचा आनंद लुटण्यासाठी येत असत. परंतु, तमाशाकडे पाहण्याचा बदलत्या दृष्टीकोनामुळे रसिक प्रेक्षकांकडून तमाशाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत चालले आहे. तसेच, तमाशा फडांच्या असुरक्षित भावनेमुळे तमाशाचे फड भरवले जात नसल्याने महाराष्ट्राची लोककला लोप पावत आहे.
सुगीचे दिवस संपल्यानंतर शेतकरीवर्गास यात्रेचे वेध लागतात. पावसाळी व हिवाळी हंगाम आटोक्यात आल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्टा तेजीत असतो. ठिकठिकाणी गावागावातून भरत असलेल्या यात्रेला शेतकरीवर्ग भाविकतेने भेटी देत आनंद द्विगणीत करत असतो. डिसेंबर महिन्यात अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथे पर्वतवासी श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने पारंपारीक पद्धतीने यात्रा भरते. ही यात्रा प्रतिवर्षी दत्त जयंती निमित्त पाच दिवस पारंपारिक पद्धतीने भरते. यंदा या यात्रेला गुरूवार दि.4 डिसेंबरपासून सुरूवात झाली असून पुढील चार दिवस ही यात्रा भरणार आहे. या यात्रेला सर्वात मोठी व आर्थिक उलाढालीची यात्रा म्हणून ओळख आहे. कोरोना कालावधी सोडला तर प्रतिवर्षी या यात्रेत रायगडसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी वर्ग, भाविक, पर्यटक व यात्रेकरू येत असतात. तसेच, ही यात्रा विविध वस्तूंचे स्टॉल, मिठाईची दुकाने व आकाश पाळण्यांने भरलेली असते. परंतु, एकेकाळी या चौल दत्त यात्रेला तमाशा व लावणीचे फडाचे मुख्य आकर्षण होते. काही वर्षांपूर्वी तमाशा व लावणी प्रेमींच्या मागणीने या ठिकाणी तमाश्याचे दोन फड येत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या तमाशा फडाला मोठी गर्दी होत असे. ढोलकीच्या ठेक्यावर व लावणीच्या तालावर येथील रसिक प्रेक्षक ठेका धरत असत. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध तमाशा फडांनी चौल दत्त यात्रेच्या निमित्ताने तमाशा व लावणी कलावंतानी लोककलेची अदाकारी सादर केली आहे. परंतु, तो तमाशाचा नाद चौलच्या यात्रेतून हरवला आहे. यात्रेत तमाशा व लावणीच्या फडाच्या गैरहजेरीने तमाशा रसिक प्रेक्षकांमधुन खुप नाराजी व्यक्त होत आहे.
यात्रेतील रसिक प्रेक्षकांचा हिरमोड
जत्रा म्हटली की, ढोलकीचा ठेका अन् लावणीचा ताल, असं समीकरण असायचं. कोणी एकेकाळी चौलच्या दत्तयात्रेच्या निमित्ताने भरवला जाणारा तमाशा व लावणीचा फड रसिक प्रेक्षकांची खरी आवड होती. परंतु, काही वर्षांपासून चौलच्या यात्रेतील तमाशा व लावणीचा फड हद्पार झाला आहे. अनेकदा रसिक प्रेक्षकांनी चौलच्या यात्रेत तमाश्याचा फड पुनस्यः सुरू व्हावा म्हणून मागणी केली, तसेच प्रयत्न देखील केले. परंतु, काहींनी तमाशा फडाकडे गैर मागणी केल्याने त्यांनी चौलच्या यात्रेकडे तोंड फिरवले आहे, असे आरोप स्थानिकस्तरावरून होत आहेत. तसेच, आजच्या मोबाईलच्या युगात तमाशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. त्यामुळे तमाशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे तमाशाच्या आर्थिक उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट होत असून काहींना नाहक त्रासाने व सुरक्षीत भावना नसल्याने तमाशा फड चौलच्या यात्रेत येत नसल्याचे देखील स्थानिक स्तरावरून बोलले जात आहे.
चौल यात्रेत तमाशा फड येत नसल्याने येथील रसिक प्रेक्षक लोककलेच्या आनंदाला मुकला आहे. त्यांच्याकडून नाराजीचा सुर उमटत आहेत. त्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन पुनस्यः तमाश्या व लावणीचा फड सुरू करावा आणि यात्रेतील ढोलकीचा ठेका अन् लावणीचा ताल पुन्हा घुमावा आणि लोककलेच्या परंपरेचा आस्वाद पुनस्यः रसिक प्रेक्षकांना मिळावा.
तमाशा प्रेमी,
चौल
