तमाशाचा फड बोलवण्याची रसिक प्रेक्षकांची मागणी
। रेवदंडा । वार्ताहर ।
जत्रेंच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा तमाशा व लावणीची जपवणूक झाली आहे. रसिक प्रेक्षक या जत्रेच्या माध्यमातून लोककलेचा आनंद लुटूत असतात. कोणी एकेकाळी तमाशा व लावणीचा फड चौल दत्तयात्रेच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांची खरी आवड होती. जत्रा म्हटली की, ढोलकीचा ताल, ढोलकीचा ठेका, लावणीचा ताल अस्सल मराठी ढोलकी व लावणीचा तोडा…मात्र चौलच्या श्री दत्त यात्रेतील तमाशा व लावणीचा फडाचा नाद हरवला असून तमाशा व लावणीच्या फडाच्या गैरहजेरीने प्रेमी रसिक प्रेक्षकांची खुप नाराजी आहे.
चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्दीस आहे, प्रतिवर्षी पाच दिवस दत्त जयंती निमित्त या भव्य यात्रेचे नियोजन पारंपारिक पध्दतीने होत असते. सर्वात मोठी व आर्थिक उलाढालीची यात्रा म्हणून चौल श्री दत्त यात्रेची ओळख आहे. कोरोना कालावधी सोडला तर प्रतिवर्षी चौल श्री दत्तयात्रेस रायगडसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून चौल श्री दत्त यात्रा भाविक,पर्यटक व यात्रेकरू यांच्या प्रचंड गर्दीने भरते. महाराष्ट्रातील यात्राची परंपरेची जपवणूक चौल श्री दत्त यात्रेने खर्या अर्थाने ठेवली गेली आहे.
सुगीचे दिवस संपल्यानंतर शेतकरीवर्गास यात्राचे वेध लागतात, पावसाळी व हिवाळी हंगाम आटोक्यात आल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या तेजीत असतो. ठिकठिकाणी गावागावातून भरत असलेल्या यात्रेला भाविकतेने शेतकरीवर्ग भेटी देत आनंद व्दिगणीत करतो. चौल भोवाळे येथे पर्वतवासी श्री दत्त जयंती उत्सवाचे निमित्ताने पारंपरीक पध्दतीने श्री दत्त यात्रा भरते. या यात्रेस परिसरातील शेतकरी बंधू निश्चित येतात. चौल यात्रेच्या निमित्ताने विविध वस्तूचे स्टॉल, मिठाई, आकाश पाळणे आदी अनेक दुकाने थाटलेली असतात.
परंतू चौल श्री दत्त यात्रेत मुख्य आकर्षण होते ते तमाशा व लावणीचा फड, काही वर्षापूर्वी तमाशा व लावणी प्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मागणी व आवडीने येथे तमाश्याचे दोन फड येत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमित्ताने या तमाशा फडाला मोठी गर्दी रसिक प्रेक्षकांची होत असे. तमाशाच्या ढोलकीच्या ठेकावर व लावणीच्या तालावर येथील रसिक प्रेक्षक ठेका धरत असत. महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द तमाशा फडानी चौल श्री दत्त यात्रेच्या निमित्ताने तमाशा व लावणी कलावंतानी लोककलेची अदाकारी येथे रसिक प्रेक्षकांना सादर केली आहे.
मात्र कुठे काय बिनसले, चौल श्री दत्त यात्रेतील तमाशा व लावणीचा फड हद्दपार झाला. चौल यात्रेत प्रतिवर्षी येत असलेला तमाश्याचा फडाची उपस्थिती गेले काही वर्ष होत नाही. अनेकदा रसिक प्रेक्षकांनी चौल श्री दत्त यात्रेस तमाशाचा फड पुनश्च सुरू व्हावा म्हणून मागणी केली, प्रयत्न केले. परंतु काहीच्या गैर मागण्याने तमाशा फडांनी चौल श्री दत्त यात्रेस तोंड फिरविल्याचा आरोप स्थानिकस्तरावर केला जातोय. व त्यामुळे आर्थिक उत्पन्नात होत असलेली घट, काहीच्या नाहक त्रासाने व सुरक्षीत भावना नसल्याने येथे तमाशा फड मंडळी येथ नसल्याचे म्हटले जातेय.
येथील रसिक प्रेक्षक मात्र तमाशा व लावणीच्या लोककलेल्या आनंदास मुकला असून सर्व स्तरातून चौल यात्रेत तमाशा फड येत नसल्याने नाराजीचा सूर येत आहे. कोणीतरी पुढाकार घेवून चौल श्री दत्त यात्रेतील तमाशा व लावणीचा फड सुरू करावा. चौल श्री दत्त यात्रेतील ढोलकीचा ताल, ढोलकीचा ठेका, लावणीचा ताल पुन्हा घुमावा व लोककलेच्या परंपरेचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे.