नवीन पनवेल मधील हवेत दुर्गंधी

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
पनवेल । वार्ताहर ।
एकीकडे कोरोना हे वैश्‍विक संकट आहेच. त्याचबरोबर मलेरिया डेंग्यू या आजारामुळे ही नागरिक त्रस्त आहेत. आणि दुसरीकडे रात्री हवेमध्ये धोकादायक वायू सोडला जातो. त्यामुळे नवीन पनवेलकरांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र दिले आहे. या संदर्भात शोध घेऊन त्वरित कार्यवाही आणि कारवाई करण्याची ग्वाही मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिले.
तळोजा एमआयडीसी किंवा पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट येथून काही कारखाने धोकादायक वायू हवेत सोडत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याप्रश्‍नी पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि स्थानिक नगरसेविका सुशिला घरत यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांना पत्र देऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. असा प्रकार घडत असेल त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी आमचे पथक पाठवून मशिनरीच्या माध्यमातून अशा प्रकारचा घातक वायू कोठून सोडला जातो याबाबत तपासणी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी ग्वाही प्रादेशिक अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version