चोरीस गेलेली दुचाकी मालकाच्या स्वाधीन

| पनवेल | वार्ताहर |

एक वर्षापूर्वी तळोजा येथून चोरी झालेली दुचाकी कळंबोली वाहतूक शाखेने केली मालकाच्या स्वाधीन केली आहे. पोलीस नाईक भीमराव मिसाळ यांच्या कार्यकुशलतेमुळे सदर दुचाकी मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केली असून दुचाकीच्या मालकाने मिसाळ यांचे आभार मानले आहेत.

शनिवारी (दि.13) संध्याकाळी शहरात वाहतूक क्रेन अंतर्गत कारवाई करीत असताना कळंबोली मॅकडोनाल्डसमोरील पार्किंगमध्ये एक बजाज पल्सर 220 दुचाकी (एमएच-46-एके-5114) पार्किंग केलेली असल्याने त्यावर कारवाईसाठी कळंबोली वाहतूक चौकीच्या आवारात क्रेनच्या साह्याने नेण्यात आली. मात्र सदर दुचाकी परत नेण्यासाठी कोणी आले नाही म्हणून दुचाकीच्या मालकाशी संपर्क साधला असता सदर दुचाकी चोरीला गेली असल्याचे समजले.

त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत असतानाच सदर चोरीबाबत तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली असून बुधवार (दि.17) रोजी सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार यांच्याशी संपर्क साधून सदर गुन्ह्यातील दुचाकी तळोजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. पुढील कार्यवाही पोलिसांकडून केली जात असून कळंबोली वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस नाईक भीमराव मिसाळ यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version