पथदिव्यांनी आंबिवली गावचे रस्ते उजळणार

माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठानचा पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत असलेले आंबिवली गाव उजळून निघणार आहे. सौ. माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानकडून आंबिवली गावाच्या मुख्य रस्त्यावर सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवले जाणार आहेत. या कामाचे भूमिपूजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवीताई जोशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यापासून गावापर्यंत सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार आंबिवली गावाच्या कमानीपासून ते आंबिवली गाव असे 24 पथदिवे, तर विसर्जन घाट, स्मशानभूमी, गावचे मंदिर प्रत्येकी एक असे एकूण 27 पथदिवे लावण्यात येणार आहेत.

या कामाचे भूमिपूजन जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवीताई जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी अंदाजे खर्च दोन लाख रुपये खर्च येणार आहे. तर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक नरेश जोशी, ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे निलेश महाजन, माणगावच्या माजी सरपंच कल्पना पारधी, माजी उपसरपंच तानाजी टोकरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version