तळा शहरातील रस्ते अंधारात

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरात एमएसआरडीसीकडून बसविण्यात आलेले हायमास्ट दिवे पाच महिन्यांचा कालावधी लोटत आल्यानंतरही बंद अवस्थेत आहेत. हे हायमास्ट दिवे पेटणार तरी कधी असा प्रश्‍न आता तळावासीयांकडून विचारला जात आहे. इंदापूर ते आगरदांडा असा रस्ता तयार झाला असून एमएसआरडीसीकडून शहरातील या रस्त्यावर दोन हायमास्ट दिवे व चौदा पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक हायमास्ट दिवा तळा-इंदापूर रस्त्यावर असलेल्या कब्रस्थानाजवळ व दुसरा मांदाड रस्त्यावर चंडिका देवी चौकात बसविण्यात आला आहे. तसेच पाच पथदिवे स्वामी समर्थ नगर पर्यंत व नऊ पथदिवे हे काळबेरे पोल्ट्रीफार्म पर्यंत बसविण्यात आले आहेत. मात्र हे हायमास्ट दिवे व पथदिवे बसवून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही ते सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह बहुतांश नागरिक दररोज सायंकाळी या रस्त्यांवर चालण्यासाठी जातात.परंतु परत येताना या रस्त्यावर अंधार पडत असल्यामुळे बर्‍याचदा विंचू व सर्प दंशाची शक्यता असते. शहरात बसविण्यात आलेले हे दोन हायमास्ट दिवे व पथदिवे सुरू केल्यास येथील मुख्य रस्ते प्रकाशमय होतील व नागरिक रात्रीच्या वेळी देखील बिनधास्तपणे या रस्त्यावरून प्रवास करतील. त्यामुळे सदर हायमास्ट दिवे व पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी तळा शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version