शिंदेंच्या बैठका रद्द, अजित पवार दिल्लीला रवाना
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा कौल मिळाला. पण, गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठका रद्द केल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तास्थापनेबाबतच्या चर्चेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली असल्याचे त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सातार्यातील दरे गावी गेलेले एकनाथ शिंदे काल रविवारी ठाण्यात परतले. ते खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार होते. पण, त्यांना घशाचा संसर्ग आणि ताप आला आहे. त्यामुळे ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे परतले नाहीत. त्यांनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. दरम्यान, अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते या भेटीदरम्यान त्यांच्याशी सरकार स्थापनेबाबत आणि खात्याच्या वाटपाबाबत चर्चा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्रीपदासाठी आग्रह आहे. अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळात गृहमंत्रीपद भाजपला देण्यात आले होते. तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा आग्रह शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते ठेवण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत हेच धोरण राहिले, याचा दाखला भाजपकडून देण्यात आला आहे. तसेच शिंदे यांना भाजपने केंद्रात येण्याची ऑफर दिल्याचे समजते. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. त्यांना राज्यातील राजकारणातच राहावे, अशी आमची इच्छा असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सोमवारी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या खात्यांवरुन रस्सीखेच
भाजपला 21 मंत्रिपदे, शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 मंत्रिपदे मिळणार आहेत. मात्र, शिंदे आणि अजित पवार हे आणखी काही मंत्रिपदे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच महत्त्वाच्या खात्यावरूनही रस्सीखेच सुरू आहे. शिंदेंनी गृह खात्यावर दावा केला आहे. याशिवाय नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, परिवहन, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ग्रामविकास आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे आग्रही आहेत. मात्र, भाजप गृहखाते सोडण्यास तयार नाही. त्यामुळे कोणाच्या खात्यात कोणती आणि किती खाती जातात, याबाबत उत्सुकता आहे.
गुरुवारी शपथविधी
एकीकडे महायुतीमध्ये महत्त्वाची पदरात पाडून घेण्यासाठी ताणाताणी सुरू असताना, दुसरीकडे मात्र शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. 5) मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तसेच भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचेही काही आमदारांना यावेही मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.