लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणाचा करणार निपटारा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दाखलपूर्व व आणि प्रलंबित खटल्याचा जलद गतीने निपटारा व्हावा, यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 14 डिसेंबरला करण्यात आले आहे. 52 हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा या माध्यमातून होणार आहे. त्यामध्ये भूसंपादन, बँक, कामगार, वीजचोरी यासारख्या प्रकरणांचा समावेश असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी सांगितले.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात चार लोक न्यायालय भरविण्याच्या सूचना आहेत. आतापर्यंत तीन वेळा लोक न्यायालय भरविले असून, चौथे लोक न्यायालय 14 डिसेंबरमध्ये घेतले जाणार आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात 23 हजार 529 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. 25 कोटी 58 लाख 67 हजार 36 रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे. अनेक प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे. मोटार अपघात प्रकरणामध्ये 25 मोटार अपघात प्रकरणामध्ये तडजोड झाली आहे. दोन कोटी 39 लाख 76 हजार 700 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लोक अदालतीमध्ये न्यायालयात येण्याची सक्ती न करता, व्हीडीओ कॉलचा वापर करून ही प्रकरणे मिटविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 डिसेंबरला होणार्या लोक अदालतीमध्ये वकील व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.