आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम, थळ
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम, थळ तर्फे, ‘माझे हृदय माझी जबाबदारी’ या विषयावर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल पोतदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रम आरसीएफ कुरुळ कॉलनीमधील कम्युनिटी हॉल येथे पार पडला. आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम हि आरसीएफ थळ मधील सेवानिवृत्त कर्मचार्यांची कल्याणकारी संस्था आहे. संस्थेतर्फे नेहमीच सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या करिता उपयुक्त असे कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ.अनिल पोतदार हे एक ख्यातनाम हृदयरोग तज्ञ आहेत व आरसीएफ हॉस्पिटल मधील व्हिजिटिंग कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुद्धा आहेत. सेवानिवृत्तीनंतर हृदयविकाराचा धोका जास्ती असतो हे लक्षात घेऊन फोरम तर्फे सभासदांना मार्गदर्शन करण्याकरता डॉ. पोतदार यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. पोतदार यांनी स्लाईड शोच्या सहाय्याने हृदयविकार, त्याची कारणे, लक्षणे, उपाय, त्यावरील विविध प्रकारची ऑपरेशन्सबद्दल माहिती सांगितली. अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास या सर्व शस्त्रक्रियांचे फायदे सांगितले. हृदयविकाराच्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी जीवनशैली कशी असावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कोणते तेल, तूप वापरावे, किती प्रमाणात वापरावे याचे महत्व विशद केले. दररोज काही ना काही तरी व्यायाम करणे हे हृदयविकार टाळण्यास मदत करते याविषयी माहिती सांगितली.
चालणे, सायकलींग, पोहणे, योगा या सर्वांचे हृदय विकार टाळण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी दररोज कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा व्यायाम करणे आवश्यकच आहे यावर भर दिला. पावसाळ्यात जर चालायला जाणे शक्य नसेल तर घरातील जिन्याची चढ-उतार करणे हा सुद्धा एक व्यायाम होऊ शकतो. कार्यक्रम आयोजित करण्याकरीता डॉ. जी टी पाटील, रवींद्र वर्तक, श्रीनिवास पाटील, विष्णू बापट, शरद देशमुख, श्रीनाथ कवळे, अभिमन्यू पाटील, रमेश म्हात्रे, माधव पाटील, अनिल मेहता, विनोद गांधी, सुधीर सावंत, विलास घरत, राजन कुलकर्णी विवेकानंद भागवत, सूर्यकांत पाटील, विजयकुमार जाधव, शरद पाटील, अरुण मोरे, अनंत भिडे, संजय भोगटे, अजित नाईक , मंगेश भगत व इतर कार्यकारी सभासदांनी खास परिश्रम घेतले.