पाईपलाईनच्या कॉकवरच अनधिकृत बांधकाम; संबंधित स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पाईपलाईनवर अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी नोटीस पाठवून बांधकाम तोडण्यास सांगितले आहे. परंतु, बांधकाम काढणे तर दूरच, संबंधितांनी लोखंडी स्टील टाकून पक्के बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. मात्र, संबंधित स्थानिक प्रशासनाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय तिवारी, अवधेश ठाकूर आणि पिंटूकुमार सिंग या परप्रांतियांनी अनधिकृतरित्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाच्या जागेवर बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे खारेपाटाला पाणीपुरवठा होणार्या पाईपलाईनवर पाणी सोडणे व बंद करण्याचा कॉक बसवलेला आहे. त्या कॉकच्या वर या तिन्ही इसमांनी शासनाला आपल्या खिशात ठेवून बांधकाम केल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे बांधकाम होत असताना स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झोपा काढत होते का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अजय तिवारी, अवधेश ठाकूर, पिंटूकुमार सिंग या तिघांना 28 नोव्हेंबर रोजी या तिघांना नोटीस पाठवून बांधकाम काढण्यास सांगितले आहे. घटनास्थळी आमचे प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी गेले असता बांधकाम काढणे दूर, त्यावर लोखंडी स्टील टाकून स्लॅब टाकण्याची तयारी जोरदार सुरू होती. किरण नामक ठेकेदार हे बांधकाम करत आहे. हे तेथील कामगारांनी सांगितले. तसेच कामगारांनी हे ही सांगितले की, आम्हाला बांधकाम बंद करण्याच्या सूचना आमच्या शेठने दिलेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही बांधकाम करणारच. एकंदरीत काय तर, अनधिकृत बांधकाम करणार्यांना शासकीय अधिकार्यांचा वरदहस्त तर नाही ना? सदरील जागा ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असून, त्या जागेतून पाईपलाईन ही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नेलेली आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी या बांधकामाला परवानगी देत असताना सदरील बांधकाम कोठे चालू आहे, हे बघणे गरजेचे होते. तिन्ही विभागाच्या अधिकार्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला रितसर दिला गेला आहे. परंतु, पुन्हा हेच जमीन मालक रस्त्यासाठी संपादित केलेल्या जागेवर सर्रास नव्याने बांधकाम करताना दिसत आहेत. वाशी नाक्यावर जे बांधकाम झाले आहे, अशा प्रकारचे बांधकाम खारपाड्यापासून कोलेटीपर्यंत सर्रास झालेली आहेत, हेही विदारक चित्रच आहे. पाईपलाईनच्या कॉकवर केलेले बांधकाम वेळेस न काढल्यास स्थानिक राजकीय मंडळी संर्घषाच्या पवित्र्यात आहेत. या अनधिकृत बांधकाम करणार्या तिन्ही परप्रांतियांविरूद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास भविष्यात असे अनधिकृत बांधकाम करण्याचे धाडस वाढल्याशिवाय राहणार नाही.
28 नोव्हेंबरलाच आम्ही अनधिकृत बांधकाम काढण्याचे पत्र दिले आहे. सदरील जागा ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असल्याने ज्या इसमांनी बांधकाम केले आहे, त्यांच्याविरूद्ध कायदेशीर गुन्हे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच नोंदवू शकते.
– आर.जे. पाचपोर, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग