जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी प्रतिक्षेत; अतिवृष्टीमुळे बसला मोठा फटका
। अलिबाग । प्रतिनिधी।
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सात हजार 824 शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. परंतु, आचारसंहितेमुळे मदत रखडली होती. मात्र, आता नव्याने स्थापन होणार्या सरकारकडे भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकर्यांना लागून राहिली आहे. सुमारे दोन कोटींहून अधिक रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या भरपाईची प्रतीक्षा शेतकर्यांना लागून राहिली आहे.
जुलै ते ऑगस्ट या कालावधीत वादळी वार्यासह झालेल्या अतिवृष्टीत भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी भाताची रोपे पाण्याखाली गेल्याने कुजून गेली. शेतजमीन पाण्याने तुडुंब भरून गेली होती. काही रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला. भातशेती, जिरायती शेतीसह दोन हजार 324.23 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. 664 गावांतील सात हजार 825 शेतकर्यांची मोठी हानी झाली. त्यामध्ये जुलै महिन्यात 573 गावांमधील सहा हजार 879 शेतकर्यांच्या दोन हजार 194.72 हेक्टर तसेच ऑगस्टमध्ये 39 गावांमधील 147 शेतकर्यांच्या 55.23 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने तयार करून सप्टेंबरमध्ये शासनाला पाठविला. परंतु, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे नुकसानभरपाई देणे लांबणीवर पडले आहे. तरी, नव्या सरकारने सत्तेवर येताच तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नुकसानीवर नजर
महिना | गावे | शेतकरी | बाधित क्षेत्र |
जुलै | 625 | 7678 | 2 हजार 269 हेक्टर |
ऑगस्ट | 39 | 147 | 55.23 हेक्टर |
एकूण | 664 | 7825 | 2324.23 हेक्टर |
परतीच्या पावसातही भातपीक अडचणीत जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात सात हजार 678 शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. दोन हजार 269 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 55.23 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 147 शेतकर्यांचे नुकसान झाले. या नुकसानीपासून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना कापणी योग्य झालेले भातपीक परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे कापणी लांबणीवर गेल्याने शेतकर्यांना प्रचंड फटका बसला. नोव्हेंबरमध्ये होणारी कापणी आजही अनेक गावांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.