| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेत विविध उपक्रमाद्वारे कृषिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी परिसरात रोपलागवड करत वृक्षारोपणाची प्रतिज्ञा घेतली. गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत नेणवलीमार्फत शेवग्याची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यांनतर ग्रामपंचायतमधून वृक्षदिंडी काढण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. शाळेतील मुलांनी ‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रमाअंतर्गत काही झाडे आणली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किसन कोंडे, मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके, विषय शिक्षक रवींद्र हंबीर व सर्व विद्यार्थ्यांनी परिसरात रोपलागवड केली. तसेच नेणवली उपकेंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मल, आशा कार्यकर्त्या गोळे आणि सहायकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी कृषिदिनाचे महत्त्व व वृक्ष निगा, जोपासना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.