समुद्र किनाऱ्याचा अभ्यासदौरा संपन्न

| उरण | प्रतिनिधी |

अरबी समुद्राच्या खाडीचे सानिध्य लाभलेला उरण तालुक्यातील जवळपास पाच हजार लोकवस्तीचा गाव म्हणजे वशेणी गाव. अरबी समुद्राचे करंजा बंदर मार्गे पाताळगंगा नदीपर्यत पाणी घुसते. याच पाताळगंगा खाडीत वशेणी दादर हा समुद्राचा खाडी किनारा येतो. बदलत्या हवामान व लोक जीवनशैलीचा या खाडी किनाऱ्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नुकताच वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा समुद्र किनाऱ्याचा अभ्यासदौरा संपन्न झाला. या अभ्यास दौऱ्याची सुरूवात समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जलपूजेने करण्यात आली. या वेळेस समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला. यानंतर खाडी किनारा, कांदळवने, खाजनाची जागा, समुद्री जीव यांचे निरीक्षण आणि तौलनिक अभ्यासदेखील करण्यात आला. या तौलनिक अभ्यासातून गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वीचा समुद्र किनारा आणि आताचा समुद्र किनारा यामध्ये खूपच बदल झालेला दिसून आला.

Exit mobile version