| उरण | वार्ताहर |
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील भुयारी मार्गावर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात चार चाकी गाडीचे नुकसान झाले असून वाहन चालक थोडक्यात बचावला आहे.
जेएनपीए बंदर प्रशासनाने एन.एच.फोर.बी.च्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पलस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे. या महामार्गावरील धुतूम गावातील नागरिकांना व प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एन.एच.फोर.बी.ने धुतूम गावाजवळ भुयारी (अंडर पास) मार्गाची उभारणी केली आहे. परंतु सदर भुयारी मार्ग हा प्रवासी वाहतूकीसाठी असताना या रस्त्यावरून रात्री अपरात्री सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे. त्यातच सोमवारी (दि.31) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मालवाहू कंटेनर चार चाकी गाडीवर पलटी होण्याची घटना घडली आहे. सुदैवानी सदर अपघातात फोर व्हीलर गाडीचे नुकसान झाले असून चालक थोडक्यात बचावला आहे.
एन.एच.फोर.बी.ने धुतूम गावातील रहिवाशांच्या रहदारीसाठी जो भुयारी मार्ग बनविला आहे तो चुकीचा असून सदर मार्ग हा पुर्वापार नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर बनविण्याची धुतूम ग्रामपंचायतीची मागणी असून, तशा प्रकारचे पत्र संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच, रहिवाशांच्या सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहनाची रहदारी व बेकायदा पार्किंग केली जाते त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सौ.सुचिता ठाकूर, सरपंच, धुतूम