| मुंबई | प्रतिनिधी |
विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी द्यायची, याविषयी गेला आठवडाभर काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींमध्ये मंथन सुरु होतं. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चाही केली होती. अखेर विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे काँग्रेसचं प्रदेशाध्यपद विदर्भात असताना, विरोधी पक्षनेतेपदही विदर्भातच देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलाय. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, सुनील केदार यांची नावे विरोधी पक्ष नेतेपदासाठी चर्चेत असताना वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावून काँग्रेसने डबल गेम खेळला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले, त्यावेळी काँग्रेसने काही महिन्यांसाठी ही जबाबदारी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर सोपवली होती. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काही महिने शिल्लक असताना वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. सहा महिन्यात त्यांनी भाजपवर कडक प्रहार करुन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विदर्भ ओळखला जातो. त्याच विदर्भातून सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही येतात. तिथेच विरोधी पक्षनेतेपद देऊन बालेकिल्ला अधिक मजबूत करतानाच भाजपवरही चढाई करण्याची रणनीती काँग्रेसने आखल्याचं बोललं जातंय.