प्रवाशी वर्गातून ‘कृषीवल’चे आभार
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार्या झाडांमुळे येथे रात्रीच्या सुमारास दाट अंधार पसरलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडले आहेत. या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत होती. त्याबाबत ‘कृषीवल’ने बातमी प्रकाशीत करताच प्रशासनाकडून खिंडीत पथदिवे बसविण्याची सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून ‘कृषिवल’चे आभार व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र, तसेच शाळा कॉलेज असल्यामुळे या मार्गावर छोट्या-मोठया वाहनांची सतत वर्दल सुरु असते. त्यामुळे सुकेळी खिंडीतील रस्त्याला दोन्ही बाजूला असणारी मोठं-मोठी झाडे, शिवाय या रस्त्याला असणारे चढ-उतार व अवघड वळणे रात्रीच्या अंधारात दिसत नाहीत. तसेच, रात्रीच्या वेळी येथील जंगलातून वन्यप्राणी रस्त्यावर येतात. ते वाहनांखाली येऊन जखमी होतात. त्याचबरोबर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे सुकेळी खिंडीत पथदिवे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात आली असल्याची बातमी ‘कृषीवल’मधून प्रकाशित करण्यात आली होती. त्याची दखल घेत सुकेळी खिंडीत पथदिवे बसविण्याचर सुरुवात झाली असुन लवकरच सुकेळी खिंडीतील भाग प्रकाशमय होणार आहे.