पालिकेच्या परवानगीने फलक उभारणी; कामगारांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर जाहिरात फलक उभारताना क्रेनची केबल तुटून अपघात घडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यावेळी काम करणारे कामगार थोडक्यात बचावले होते. यामुळे पालिकेच्या परवानगीने फलक उभारणारी कंपनी कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत नसल्याचे स्पष्ट झाले होते.
पालिकेने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले असतानादेखील पालिकेच्या निर्देशांचे पालन कंपनी करत नसल्याने कंपनीविरोधात कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने निर्ढावलेल्या कंपनीकडून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कंपनीकडून सायन-पनवेल महामार्गावरील कोपरा गाव या ठिकाणी फलक उभारण्यात काम सुरु आहे. या कामादरम्यान कामगारांनसाठी सुरक्षिततेची काळजी घेणे अपेक्षित असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनेशिवाय सुरु असलेल्या या कामादरम्यान अपघात होऊन जीवितहानी झाल्यास पालिका प्रशासन याची जबाबदारी घेणार का, असा सवाल उपस्थित होत असून, जाहिरात फलक उभारण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी वारंवार नियमांचे उल्लंघन करत असतानादेखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
खारघर येथे घडला होता अपघात
पालिकेतर्फे जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देण्यात आलेल्या कंपनीकडून खारघर येथे उभारण्यात आलेला फलक कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. फलकाजवळ उभ्या असलेल्या काही महिला या अपघातात थोडक्यात बचावल्या होत्या. अशा वेळी कंपनीविरोधात कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, असे न करता फलकाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट सादर करणार्या कंपनीला काळ्या यादीत टाकून पालिका प्रशासनाने हात वर केले होते.
सुट्टीच्या दिवशी केले जाते काम
पालिकेकडून परवानगी देण्यात आल्यानंतरदेखील सुट्टीच्या दिवशीच फलक उभारण्याचे काम केले जात असल्याने यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
फलक उभारण्याचे काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याच्या सूचना कंपनीला करण्यात आल्या आहेत.
– सदाशिव कवठे, अधिकारी, परवाना विभाग