| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे एकदरावासियांना अभिप्रेत असलेले रामाचे मंदिर मी स्वखर्चाने बांधून देणार असल्याची ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली. या मंदिराचा आराखडा माझ्याकडे तयार असून, राज्यभरातून येणार्या पर्यटकांसाठी आकर्षक असे मंदिर उभारण्याचा शब्द जयंत पाटील यांनी यावेळी दिला. मुरुड संपूर्ण एकदरा कोळी समाज व महिला मंडळ मुंबई रहिवासी व धनुर्धारी मंडळ आयोजित राममंदिरात रामनववी उत्सवानिमित्त श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्यावेळी ते बोलत होते.
श्री राममंदिराच्या प्रांगणात असंख्य महिला, पुरुषांच्या उपस्थितीत केदार यशवंत आठवले (चौल-अलिबाग) बुवा यांचे कीर्तनाने मंत्रमुग्ध झाले. कीर्तन करणार्या बुवांना तबला देवीदास दातार (दापोली- रत्नागिरी) व हार्मोनियम गजानन दाते (थळ-अलिबाग) यांनी सुरेख साथ दिली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसह आकर्षक रांगोळ्या तसेच भगव्या पताकांनी संपूर्ण गाव लखलखत होते. पहाटे 3.45 वाजता अभ्यंगस्नान, पहाटे 5.30 वाजता काकड आरती, सकाळी 10.30 ते 12.30 वाजता श्री रामजन्मोत्सव कीर्तन, दुपारी 12.45 वाजता श्रीरामाची आरती, जन्मकाळ प्रसंगी पंचक्रोशीतील नागरिकांनीही दर्शन सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी जयंत पाटील यांनी रामभक्तांना राजनवमीच्या शुभेच्छा देताना एकदरा गाव प्रथा, परंपरा जपणारा समाज आहे असे सांगून स्व. मोतीराम पाटील यांना शब्द दिल्याप्रमाणे या पर्यटनस्थळी प्रेक्षणीय असे श्रीराम मंदिराचे नव्याने काम मी स्वतः वैयक्तिकरित्या करणार असल्याचे जाहीर केले. तसेच, एकदरा व राजपुरी या गावांतील मच्छिमारांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने मासेमारी करण्यास सहाय्य करण्याचे अभिवचन दिले. यावेळी मुरूड तालुक्यातील पंचक्रोशीत भागातील असंख्य श्रीरामभक्त हजर होते.