मतदान यंत्रावरुन ‌‘सर्वोच्च’ चर्चा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यांवर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. फक्त संशयाच्या आधारावर आम्ही आमचा निकाल जारी करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते, ज्याची उत्तरं आम्हाला मिळाली आहेत. त्यामुळे निर्णय राखून ठेवला असल्याचेही सांगण्यात आले आहे. ईव्हीएमवरच्या सुनावणीबाबत बोलताना न्यायाधीश दीपांकर दत्ता हे प्रशांत भूषण यांना म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय आहे, या आधारावर आम्ही आदेश कसा द्यायचा? जो अहवाल आम्हाला देण्यात आला आहे, त्यानुसार ईव्हीएम हॅक केल्याची किंवा त्यात काही गडबड केल्याची एकही घटना घडलेली नाही. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यावर आमचं नियंत्रण नाही. काही सुधारणा हव्या असतील तर आम्ही त्या सुधारा हे सांगू शकतो.न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला दुसरा प्रोग्राम या ईव्हीएममध्ये फीड केला जाऊ शकतो का? हे विचारलं होतं. त्यावर निवडणूक आयोगाने असं काहीही होऊ शकत नाही, असं म्हटलं होतं. फ्लॅश मेमरी प्रोग्राममध्ये निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची चिन्हं असतात. बाकी काहीही नसतं. तांत्रिक बाबींवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल.

Exit mobile version