संभाव्य प्रकल्पग्रस्तांची भूमिका कायम
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड ते नेरळ स्थानक दरम्यान चिंचवली येथील फाटक-23 येथे उड्डाण पूल बांधले जाणार आहे. या उड्डाण पुलाचे बदललेले मॅपिंग यामुळे स्थानिकांनी मोजणीवर जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रस्तावित उड्डाण पुलाच्या जागेची मोजणी करण्यात आली. परंतु, स्थानिक शेतकरी आणि घरमालकांनी आपली भूमिका कायम ठेवली असल्याने मोजणी पूर्ण झाली असली तरी उड्डाण पूलबाबत संभ्रम कायम आहे.
भिवपुरी रोड ते नेरळ स्थानक दरम्यान चिंचवली गावाजवळ असलेले फाटक-23 येथे उड्डाण पूल बांधण्याचा मुंबई रेल कॉर्पोरेशन यांचा विचार आहे. या उड्डाण पुलाच्या संभाव्य मार्गाला स्थानिकांचा विरोध आहे. हा महत्त्वाचा पूल चिंचवली गावासह भाणसोली व उकरूळ हद्दीत येत असून, या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया प्रभावी प्रशासनिक नियोजनामुळे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या संपूर्ण प्रक्रियेला रायगड जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर श्रीकांत गायकवाड यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सूज्ञ, संयमी आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे पूर्वी तणावपूर्ण असलेला विषय सौहार्दपूर्ण मार्गाने मार्गी लागला. विशेषतः शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घेत त्यांनी शेती, घरे व गोशाळा यांचे कमीत कमी नुकसान होईल याकडे बारकाईने लक्ष दिले. या भूसंपादन प्रक्रियेत रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल, कृषी, वन, भूसंपादन आणि पोलीस खात्याबरोबरच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांचेही अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे विभागाचे अधिकारी सुहास गदादरे यांनीही या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.
