| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी निवडणूक सुरू असून माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता स्थिर पथकाच्या तपासणी नाक्यामुळे माथेरानमधील व्यावसायिक नाराज आहेत. पर्यटनासाठी येणारे पर्यटकांच्या बॅगा तसेच वाहने तपासली जात असल्याने अनेक पर्यटक आपल्या किंमती वस्तूंचे नुकसान होऊ नये म्हणून माघारी देखील फिरू लागले आहेत. दरम्यान, माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांनी या पर्यटन स्थळावर असे नियम बाजूला ठेवायला हवेत अशी मागणी करून निवडणूक यंत्रणेने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी लावण्यात आलेली आचारसंहिता यांचे पालन व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणांकडून वेगवगेळी पथके कार्यरत आहेत. राज्यातील सर्व नगरपरिषद ठिकाणी अशी पथके कार्यरत आहेत. नगरपरिषद क्षेत्रात प्रवेश करणारी वाहने यांची तपासणी करून बेकायदेशीरपणे अवैध वाहतूक होऊ नये यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत आहे. माथेरान थंड हवेच्या ठिकाणी गिरीस्थान नगरपरिषद असून तेथे देखील दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्या माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरात अवैद्य मद्य, पैशाची हत्यारांची अवैद्य वाहतूक होत असल्याने त्यावर रोख लावण्यासाठी माथेरान शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर हे पथक 24 तास सेवा बजावत आहे. स्थिर सर्वेक्षण पथकामधील टीमकडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात प्रामुख्याने स्थानिक वाहनाऐवजी पर्यटक ज्या वाहनातून शहरात येत आहेत अशा वाहनांची तपासणी केली जात आहे. पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे अनेकदा विदेश मद्य स्वतःच्या सेवनासाठी सोबत घेऊन येत असतात. पर्यटन स्थळ असल्याने मद्याचे दर माथेरानमधील हॉटेल्स आणि बार येथे अधिक असतील या शंकेने पर्यटक ही काळजी घेत असतात. मात्र, आदर्श आचारसंहिता अशा पर्यटक लोकांना अडचणीची ठरत आहे.
माथेरानच्या दस्तुरी नाका येथे बनवण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी केली जात आहे. तसेच नेरळ येथून नेरळ माथेरान मिनी ट्रेनने प्रवास करणाऱ्या पथकाकडून माथेरान स्टेशन येथे स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत आहे. या पथकाकडून केवळ पर्यटकांची वाहने तपासली जात असल्याने मोठा गोंधळ पर्यटकांच्या मनात निर्माण झाला आहे. हजारो रुपये किमतीचे मद्य स्वतःच्या मद्यपान करण्यासाठी आणल्याने ते जप्त करण्यात येत असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. मद्याच्या अशा अनेक बॉटल जमा करण्यात येत असल्याने या तपासणी नाक्याचा थेट परिणाम माथेरानमधील पर्यटनावर होऊ लागला आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकांनी सुरू केलेल्या वाहने तपासणी मोहीममुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय काही दिवस बंद पडण्याची शक्यता आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची तपासणी दस्तुरी येथे होत असल्याने पर्यटक नाराज होऊन पुन्हा माघारी देखील पडताना दिसत आहेत. याबाबत माथेरान हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल व्यावसायिक अजय सावंत यांनी निवडणूक आयोगाने पर्यटकांवर वाहने न तपासता स्थानिकांची वाहने टॅक्सी तपासूनच पुढे पाठवावी अशी सूचना केली आहे.
आमच्या गावात पर्यटक आले तर आम्हाला रोजगार मिळेल. पर्यटकांची वाहने तपासली जात असल्याने अनेक पर्यटक दस्तुरी येथून माघारी फिरत आहेत. त्यामुळे रोजगार हिरवला जाण्याची शक्यता आहे. शहर हे पर्यटनावर अवलंबून असल्याने असे प्रकार घडल्यास पर्यटक येणार नाहीत आणि चुकीचा मेसेज पर्यटन क्षेत्रात पसरला जाईल. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा.
– रेखा चौधरी
हॉटेल व्यावसायिक






