पंतप्रधानांच्या दौऱ्याचा दिवस निश्चित नसताना यंत्रणा कामाला

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली, नसताना सरकारी यंत्रणा मोदींच्या स्वागताच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. सिडको, नवी मुंबई, पनवेल महापालिका आणि महसूल प्रशासनाची बैठक मंत्रालयात सोमवारी पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी यंत्रणांकडून, मात्र याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. नारीशक्ती सन्मान योजना, नवी मुंबई मेट्रो प्रकल्प आणि पालघरमधील आणखी एका प्रकल्पाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. खारघरमध्ये होणारा कार्यक्रम कोणत्या दिवशी, किती वाजता होईल. याबाबत अद्यापही कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

13, 14, 15 आणि 17 ऑक्टोबर यापैकी एका दिवशी मोदी येवू शकतील, अशी शक्यता आहे. वेळ-काळ निश्चित नसल्याने अधिकारी प्रस्तावित दौरा असाच उल्लेख करीत आहेत. पनवेल महापालिकेत काही दिवसांपूर्वी प्राथमिक बैठक पार पडली. त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रशासनाने काम सुरू केले आहे. सिडको, महसूल प्रशासन, नवी मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनुष्यबळ मदतीला असले, तरी यजमान म्हणून पंतप्रधानांच्या दौऱ्याचा भार पनवेल महापालिकेवर आला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी 8 समित्या स्थापन करून विभागप्रमुखांना जबाबदारीचे वाटप केले आहे. महाराष्ट्र भूषण सोहळा पार पडलेल्या कार्पोरेट मैदानावरच हा कार्यक्रम होणार असल्यामुळे मैदानाची साफसफाई, स्वच्छतागृह, शहरातील रंगरंगोटी, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती, आपत्ती व्यवस्थापन, कार्यक्रम प्रसिध्दीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यी कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी यांच्या मुख्य उपस्थितीतीत नियोजनासंदर्भांत सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत देखील दौऱ्याबाबत निश्चित वेळ नसल्यामुळे प्राथमिक चर्चां करण्यात आली. परंतु दौरा निश्चित होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन कामाला लागल्याचे बोलले जाते. सिडकोचे एमडी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आदी या बैठकीत होते, अशी माहिती आहे.

पनवेल महापालिकेने मात्र दौरा निश्चित होण्याची वाट न पाहता खारघरमधील रस्त्यांची डागडुजी, सायन पनवेल महामार्गांवरील पथदिवे सुरु करणे, शहराची रंगरंगोटी आदींच्या कामाला सुरूवात केली आहे. महापालिकेतील अनेक उपायुक्त सध्या या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते.

Exit mobile version