दिवसेंदिवस होत असलेले नागरिकांचे स्थलांतर कारणीभूत
तळा | श्रीकांत नांदगावकर |
तळा तालुक्यातून दिवसेंदिवस नागरिकांच्या होत असलेल्या स्थलांतरामुळे तळा बाजारपेठ हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहे. १९९९साली तळा तालुक्याची निर्मिती झाली.तालुक्यातील बहुतांश नागरिक हे शेती करीत असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न तसेच घरातील एखादा माणूस मुंबई सारख्या शहरात कामाला असल्याने दर महिन्याला गावी पैसे पाठवून देत असत यामुळे गावी जरी मोठा कुटुंब असला तरी घरखर्च सहज भागविला जात असे.शहरात असलेल्या १२ वाड्या व आजूबाजूला असलेली ८४ गावे यांना एकच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पूर्वी तळा बाजारपेठ नेहमी गजबजलेली असायची.
बाजारपेठ परिसरात नवनवीन इमारती उभ्या राहिल्या त्यात आलिशान गाळे व गाळ्यांमधून नवनवीन व्यवसाय सुरू झाले.तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येत असल्यामुळे तळा बाजारपेठेचा विस्तार देखील हळूहळू वाढू लागला होता.परंतु कालांतराने वाढलेली महागाई,महागलेली शेतीची बियाणे,कामगारांची वाढती मजुरी यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. शेतीत उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त प्रमाणात होत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश नागरिकांनी शेती करणे सोडून दिले आहे.
यामुळे घरखर्च चालविण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागल्याने उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न येथील नागरिकांना सतावू लागला.तालुक्यात कोणत्याही प्रकारचे कारखाने अथवा एमआयडीसी नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात येथील नागरिकांना शहराकडे जावे लागले.महिलांना देखील घरकामात चांगले पैसे मिळू लागल्याने हळूहळू कुटुंबच्या कुटुंब तालुक्यातून स्थलांतरित होऊ लागली.या सर्वांचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे.अशातच सध्या सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे बाजारपेठेतील रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य व सुनसान झालेले पहायला मिळतात.बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची संख्या मंदावल्यामुळे येथील सर्व व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे.नवीन व्यवसाय सुरू करणे तर दूरच आहेत ते व्यवसाय देखील टिकवणे कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे दिवसेंदिवस दिवस तळा बाजारपेठ कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.