वाहतूक विस्कळीत
| महाड | प्रतिनिधी |
महाड, पुणे मार्गावर वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हा टँकर घाटात अवघड वळणावर अडकल्याने वाहतूक ठप्प झाली. गेली काही महिने हा मार्ग दुरुस्तीसाठी अवजड वाहनांकरिता बंद करण्यात आला होता, मात्र दुरुस्तीनंतर घाट पुन्हा सुरु केल्याने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. घाट वाहतुकीस धोकादायक असताना देखील अवजड वाहने पाठवली जात होती, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.
वरंध घाटात सलग दोन वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे हा मार्ग सातत्याने बंद ठेवला जात आहे. हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. एस. टी. बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मध्यंतरी या घाटातील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर घाट रस्ता वाहतुकीस पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र या अरुंद घाट रस्त्यात अवजड वाहनांना हा मार्ग धोकादायक असतानाही या मार्गावरून बारा ते सोळा चाकी वाहने सोडली जातात. यामुळे घाटात ही अवजड वाहने अडकून वाहतूक ठप्प होते. शनिवारी दुपारी अशाच प्रकारे एक टँकर अडकून पडला आणि कांही तासाकरिता हा मार्ग बंद राहिला. यामुळे छोट्या वाहनांना देखील थांबावे लागले. यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे एक टँकर याच ठिकाणी अडकून पडला होता मात्र सातत्याने या घटना घडून देखील याबाबत कोणतीच दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.