अमानुषपणाचा कळस! अभ्यास केला नाही म्हणून शिक्षिकेने केली अशी शिक्षा

साडेतीन वर्षीय चिमुरडीला चटके
पनवेल । वार्ताहर ।
दिलेला अभ्यास नीट करत नाही म्हणून रागाच्या भरात शिकवणी शिक्षिकेने अमानुषपणाचा कहर करीत एका साडेतीन वर्षीय चिमुरडीला उलटे करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाल अत्याचार कलमान्वये शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.

साधना गायकवाड असे आरोपी महिलेचे नाव आहे. मकरंद विहार, घरकुल सोसायटी सेक्टर 15 खारघर येथे ती शिकवणीचे वर्ग घेत आहे. याच शिकवणी वर्गात आजिनाथ बावरे यांची साडेतीन वर्षीय मुलगी शिकवणीसाठी येत होती. गेल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे तिला पालकांनी शिकवणीला संध्याकाळी 4 वाजता सोडले व 8 वाजता घेऊन आले. मात्र तिचे गाल, हात, पोटरी लाल झाल्याची दिसत होती. पीडित चिमुकलीला निटसे सांगता येत नव्हते. रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला व चटके दिल्याचे स्पष्ट झाले.

पालकांनी तिच्यावर उपचार करून शिक्षिकेविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे तपाधिकारी म्हणून काम पाहत आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Exit mobile version