38 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी 38 डिग्री सेल्सियस नोंद झाली असून, या उकाड्याने नागरिकांसह प्राणीही हैराण झाले आहेत. तीव्र उन्हाळा आणि वाढत्या तापमानामुळे मुक्या प्राण्यांनी थंडावा मिळवण्यासाठी समुद्राचा आश्रय घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पक्षी, भटकी कुत्री तसेच इतर प्राणी पाण्याच्या सान्निध्यात विसावलेले दिसून येत आहेत. समुद्राच्या थंड वाऱ्यामुळे आणि पाण्यामुळे त्यांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. दुपारच्या वेळेत तापमानाचा पारा चढत असल्याने अनेक प्राणी सावलीच्या जागा शोधत समुद्रकिनारी गर्दी करत आहेत.
