उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही
| उरण | प्रतिनिधी |
उरण जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालला आहे. उरणचे कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअसवर स्थिर असल्याने उरणकरांची अक्षरशः होरपळ सुरू आहे. वाढत्या तापमानाने उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. चिरनेरसह इतर ग्रामीण भागातील गावात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उच्चांकी 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर उरणात 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून अनेकांना मुतखडा, पित्त, ताप, डोकेदुखी सारख्या आजारांनी ग्रासले आहे. एकंदरीत बदलत्या हवामानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांनी आपला मोर्चा हा शित पेय घेण्याकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर परिसरात उष्णतेची लाट उसळली जाणार असून पुढील काही तासांत तापमान अधिक वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उरण तालुक्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांतील ‘एप्रिल’ महिन्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद असल्याचे बोलले जात आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले असून, वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच अनेकांना मुतखडा, पित्त, ताप, डोकेदुखी सारख्या आजारांनी ग्रासले आहे. तसेच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका टाळण्यासाठी बागा व उद्यानांमध्ये लोक आश्रय घेत आहेत. ग्रामीण भागात आणि शहरालगतच्या नदी, तलाव आणि विहिरींवर बालगोपाळांसह नागरिक पोहण्याचा आनंद घेऊन या वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यामुळे सदर आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून येत आहेत. तरी उन्हामध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पडले तर टोपी, छत्री किंवा इतर साहित्याचा वापर करून, शरीराला आवश्यक असलेल्या पाणी, उसाचा रस, ताक, नारळ पाणी यांचे सेवन अधिक करावे असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
सूर्याचा प्रकोप
यंदा मार्चच्या अखेरीस उत्साहाची दाहकता वाढीस लागली आहे. एप्रिलमध्ये यात आणखी वाढ झाली. सकाळी 9 वाजेपासूनच सूर्य तळपणे सुरु झाले आहे. तर दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. यातच उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे उकाड्यात आणखीच भर पडत आहे.
